Anubhavaleli Wari 2024
Anubhavaleli Wari 2024

Mi Anubhavaleli Wari 2024 | Sarang Pampatwar

174de505e72cf26d74f309967c470d96?s=150&d=mp&r=g
Sarang Pampatwar

 Mi Anubhavaleli Wari 2024  | मी अनुभवलेली वारी…………

    Mi Anubhavaleli Wari 2024  वर्षानुवर्षे अव्याहतपणे चालत आलेली महाराष्ट्राची एक गौरवशाली परंपरा म्हणजे वारी….पर्वाच संपन्न झालेल्या आषाढीच्या निमित्ताने लाखो वारकरी आपआपल्या दिंड्यांसमवेत पंढरपुरात दाखल झाले व त्यांच्या टाळ-मृदुंगाच्या गजराने अवघा महाराष्ट्र दुमदुमून गेला. पण या एवढ्या वारकऱ्यांचा अवघा रंग ‘एक’ होतो कसा, एवढा मोठा प्रवासाचा पलडा हे वारकरी इतक्या सहजतेने पार कसा करतात, नेमके हेच जाणून घेण्यासाठी म्हणून वारीला गेलो व एक अतिशय ‘समृद्ध’ अनुभव आला. त्याचबरोबर मनाच्या पटलावरती तरंगणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली व त्या उत्तरांना पुन्हा प्रश्नदेखील पडले. या वारीचे नेमके स्वरुप, तिचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व व तिच्या उदयोन्मुख काळातील गरजा, यांचा एकठायी परामर्श घेण्यास्तव केलेला हा लेखनप्रपंच……

           ‘वारी’ या pyramid चा सर्वात खालचा व basic घटक म्हणजे वारकरी…शे-पाचशे वारकरी एकञ येतात व एक दिंडी तयार होते. या दिंड्या सुमारे वर्षानुवर्षे तशाच चालतात. बापजाद्यांनी प्राणप्रतिष्ठा केलेल्या या दिंड्या त्यांचे वारसदार तशाच जपतात…अगदी घरंदाज दागिन्यांनासारखे….!!! म्हणून हाडाच्या वारकऱ्यासाठी ‘वारी’ म्हणजे ‘वैभव’ आहे. ‘मी अमुक-अमुक इतक्या वाऱ्या केल्या’, असे छातीठोकपणे सांगणारे अनेक वारकरी वारीत पावलोपावली भेटतात. असो….या ‘दिंडी’ चं comparison मला train च्या डब्ब्याशी करावेसे वाटते. पहिला compartment हा झेंडेकऱ्यांचा असतो, दुसऱ्या compartment मध्ये डोक्यावरती तुळस घेणाऱ्या महिलांचा अंतर्भाव असतो, तिसरा compartment हा टाळकरी व भजनी मंडळासाठी आरक्षित असतो तर सर्वात शेवटच्या भागात दिंडीसह चालणारे भक्तगण सामाविष्ट असतात. हे सर्व लोक सैनिकी शिस्तीत अगदी भरभर पावले टाकत मार्गक्रमण करत असतात.

Pandharpur wari 2024
Pandharpur wari 2024

एवढेच नाही तर अशा हजारो दिंड्या वारीत सामिल असतात. या pyramid च्या आणखी वर गेलो तर कळते की अशा शे-पाचशे दिंड्यांची मिळून एक पालखी तयार होते. काही दिंड्या मुख्य पालखीरथाच्या समोर तर उर्वरित दिंड्या पालखीरथाच्या मागोमाग असतात. प्रत्येक दिंडीला एक विशिष्ट क्रमांकदेखील असतो. उदा. “क्र. 12 रथामागे” असे एकंदर स्वरुप असते. या दिंड्या देहू व आळंदीतून अनुक्रमे संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीसह प्रस्थान करतात. या क्रमांक असलेल्या अधिकृत दिंड्यांशिवाय खेड्यापाड्यातून आलेल्या हजारो निनावी दिंड्यादेखील वारीत सामिल असतात…त्यांची गनना करणे माझ्यातरी आवाक्याबाहेरचे आहे.

या दिंड्या ‘sponsored’ असतात…पण इथे कुठलाही स्वार्थ नसतो,हे विशेष. या दिंड्यांचे सर्व मुक्काम अगदी एखाद्या क्रिकेट टिमच्या दौऱ्यासारखे पूर्वनियोजित असतात. दिंडीचा जिथे मुक्काम असतो तिथे पाली टाकल्या जातात… जणुकाही एखादे छोटेसे गावच वसविले जाते. प्रत्येक दिंडी हा कारभार स्वतंञपणे करते पण म्हणून जागेसाठी कधीही भांडणतंटे झाल्याचे ऐकिवात येत नाही. हा कदाचीत proper management चा भाग असेलही पण तरीही यामागचे गुपीत म्हणजे ‘विचारांतील साम्य व समभाव’ हेच असेल…..!!!! या दिंडीत तुम्हाला जर admission घ्यायचे असेल तर fees माञ द्यावी लागते. पण ती ही नगण्यच….पण व्यवस्था टिपटॉप असते. पण तिथे राहण्यासाठी लोक येतच नाहीत मुळी….ते येतात फक्त विठ्ठलाच्या भेटीसाठी……….!!! ‘भेटी लागे जीवा, लागलेसे आस’….हे झाले वारीचे ‘mechanism’….

You will also like to read आभास | Illusion of Life

          सोयीसुविधांच्या बाबतीतही वारीची संपन्नता वाखणण्याजोगी आहे. जिथे-जिथे या दिंड्या स्थिरावतात तिथे-तिथे पोलीसांचा ताफा तैनात असतो व इतर वाहणांना परवाणगी नसते. संपूर्ण रस्ता या वारकऱ्यांसाठी राखीव असतो. त्यामुळे सुरक्षिततेची हमी असते. रस्त्याच्या एका बाजूने हे वारकरी चालतात तर दुसऱ्या बाजूने त्यांच्या सामानाची काळजी घेणारी वाहने चालत असतात. जागोजागी मोफत उपचार केंद्रेदेखील असतात. रुग्नवाहीका, वॉटर टँकर, हलते स्वच्छतागृह, इत्यादी सोयी चोखपणे कार्यरत असतात.

         ‘परंपरा’ म्हणजे ‘अंधश्रद्धा’ हे so called सुशिक्षितांच्या डोक्यातलं समिकरण नेमकं या वारीच्या बाबतीत तरी फोल ठरतं. कारण या परंपरेचं महत्त्वही तसं अपरंपार आहे. एखाद्या राष्ट्राचं सांस्कृतिक वैभव मुळात तिच्या परंपरेत सामावलेलं असतं.म्हणून तर महाराष्ट्राची वारी जगप्रसिद्ध आहे… ही खचितच आमच्या-तुमच्यासाठी गौरवास्पद बाब आहे. वारीत अगदी भारतातूनच नाही तर इतरही देशातली मंडळी सर्रास पाहायला मिळतात. ती देखील या वारीच्या प्रेमात पडली आहेत. या वारी वर पी.एच.डी ही करतात म्हणे लोक……!!! हीच तर ताकद आहे ज्ञानोबा आणि तुकोबांच्या विचारांची….!!! त्यांचे विचार आध्यात्मिक तर आहेतच पण त्यांच्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन पण तेवढाच आहे. असो..

रस्त्यांवरती असलेल्या चहाच्या टपऱ्या चालवणारे लोक, वारकऱ्यांचे सामान हलविणारे चालक, जेवण बनविणारे आचारी, पाली टाकण्यासाठी लागणारे कामगार, वारीत रस्तोरस्ती दिसणारी खेळण्याची वा इतर आवश्यक वस्तूंची छोटी-मोठी दुकाने इत्यादी लोकांचा उदरनिर्वाह वारी वर चालतो. म्हणून वारी या लोकांसाठी थोड्या काळापुरती का होईना पण वरदान ठरते. तेवढीच वारीमुळे रोजगारनिर्मिती होते, हे विशेष….

             हौशी लोकांसाठी वारी हे एक पर्यटनापेक्षा कमी नाही कारण हिरवेगार शेतमळे, बागबगिचे, पाण्याचा खळखळाट असणारे कालवे, रस्त्यात लागणारी सुंदर-सुंदर मंदीरे इत्यादींचा चालण्या दरम्यान मनसोक्त आनंद घेता येतो. तेवढेच विसाव्याचे क्षणदेखील मिळतात.

            आज कालची तरुण मंडळी फक्त मल्टिप्लेक्समध्ये जाऊन कलेचा आस्वाद घेतांना दिसते. या संक्रमनामुळे “लोककलेतून लोकशिक्षण” हे ग्रामीण साहित्याचे ब्रीद माञ कोलमडते. पण वारी माञ यास अपवाद आहे. ही वारी आजदेखील महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा वारसा लिलया जपते. अनेक गवळणी, सुंदर अभंग, ओव्या, एकनाथांची भारुडे व रामदासांच्या रचना वारीत वारंवार ऐकायला मिळतात. आजही मातीतला कलाकार हा वारीतच गवसतो. टाळकरी असतील अथवा मृदुंगवादक असतील यांचा नाद-निनाद पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. काही काही तोंडावरती सुरकुत्या आलेले वृद्ध गवळणींवरती व मृदुंगाच्या ठेक्यावरती असे थिरकतात की अगदी ऐन तारुण्यात असलेल्या तरुणालाही त्यांचा हेवा वाटावा. हे हसणे, नाचणे, उड्या मारणे, मोकळ्या हवेत चालणे, जोरजोरात तालासुरात गाणे म्हणणे, टाळचिपळ्यांच्या नादात हरवून भक्तीत बेभान होणे, इत्यादी गोष्टींमुळे त्यांचे आरोग्यदेखील ठणठणीत राहत असेल असे वाटते.

             वारीची आणखी एक खासियत म्हणजे तिथली ‘फुगडी’… आया-बाया व पुरुषमंडळी भेदाभेद बाजूला ठेऊन मोठ्या जोमाने म्हणजे sportsman spirit ने या खेळाची मजा घेतात. वारी म्हटल्यानंतर रिंगणाला विसरता येणार नाही. अनेक चॅनेलवाले लोक विळखा घालून हे रिंगणाचे दृश्य कॅमेराबंद करण्यासाठी आसुसलेले असतात. यामागचे कारण म्हणजे वारकऱ्यांची शिस्त व या रिंगणामधून धावत सुटणारा माऊलींचा अश्व…..रिंगणामुळे या सोहळ्याचे सौंदर्य अजून वृद्धिंगत होते.कधी-कधी राञी पालीत जमल्यानंतरही ‘आराम हराम है’ असे म्हणत हे वारकरी गवळणींचा असा काही भारदस्त फड रंगवतात की चालून आलेला सगळा शीन क्षणार्धात नाहीसा होतो. अशा बऱ्याच अनुभवांना आठवणींच्या डायरीत बांधता येईल अशी ही भक्तीमय व बहारदार ‘वारी’ असते.

        वारी हा जुनापुराणा trade नसून नवानवखा trend आहे असेच मला वाटते. पण वारीचे दुर्भाग्य म्हणजे यात तरूण मंडळींची टंचाई जाणवते. पण तरीही ग्रामीण भागातील काही तरुण अजूनही यात उत्साह दाखवतात….हे कौतुकास्पद आहे. वारीची आणखी एक कमकुवत बाजू म्हणजे स्वच्छतेबाबतीत असलेला जागरुकतेचा अभाव…..मुक्कामाला मुक्काम ठोकताना हे भक्तगण माञ कचरा तसाच सोडून पुढे वाटचाल करतात. तरीही ही उणीव दूर केल्यास वारीची शान दुपटीने वाढेल यात शंका नाही. वारीतील बरेच वारकरी ज्ञानोबांवर तर प्रेम करतातच पण त्याबरोबरच त्यांचे तंबाखूवरती देखील अगाध प्रेम असल्याचे दिसून येते. किमान दहापैकी एक तरी वारकरी व्यसनाधीन झाल्याचे ढोबळ निरीक्षणावरुन सांगता येईल….’व्यसनमुक्त वारी’ हे वारीसमोरचे आव्हाण आहे. ते पेलले तर विठ्ठल पावणार म्हणजे पावणार……!!व्यसनमुक्ती व कचरामुक्ती या वारीच्या गरजा आहेत हे प्रामुख्याने नमुद करावे वाटते.

          पण काहीही असो…..वारी हा विषयच मुळात evergreen आहे कारण तो ज्यांच्या विचारांवर आधारलेला आहे तेसुद्धा नेहमी त्यांच्या कीर्तीने evergreen असतात……मी अनुभवलय हे वारीवैभव…. तुम्हीही एकदा अनुभवाच…..

Author : Sarang Mampatwar

Pandharpur wari 2024
Pandharpur wari 2024
0 Shares

Leave a Reply