‘द केरला स्टोरी‘
‘अल्हा हू अकबर हे जय श्रीरामला उत्तर असू शकत नाही तसेच जय श्रीराम हे अल्ला हू अकबरला उत्तर असू शकत नाही.’
दोन दिवसांपूर्वी ‘द केरला स्टोरी‘ हा सिनेमा बघितला. मी सुन्न झालो. सुन्न कुण्या अर्थाने झालो तर त्यात शोषणाचा केंद्रबिंदू असणारी होती ती म्हणजे स्त्री. इथे प्रत्येक धर्मात शोषण हे स्त्रियांच होत आलय. द केरला स्टोरी हा त्याच शोषणाचे काही भाग आपल्या समोर मांडतो. पण पूर्ण एकांगी वाटाव्या अशा त्या सिनेमाच्या फ्रेम्स अंगावर येतात. नर्सिंन कॉलेजपासून सुरू होणारा शालीनी, गीतांजली आणि निमाहचा प्रवास शेवटी एका वेगळ्याच दुनियेत संपून जातो. या तिघींना गर्ल्स हॉस्टेलमध्ये भेटणारी नफिसा जी मुळात isis ची हस्तक असते. ती आपल्या पद्धतीशीर योजनेने शालिनी, गीतांजली यांना आपल्या जाळ्यात अडकवते.अल्हाह किती महान आहे आणि तो काय करू शकतो याची माहिती ती शालिनी आणि गीतांजलीच्या मनावर ठासवत असते.
पण इथे एक मेख अशी आहे की जेव्हा हिंदू धर्मातील देवतांबद्दल ती शालिनी आणि गीतांजली जे काही बोलत असते. ते तर्काच्या कसोटीवर खरं ठरणारं आहे. शेमड्या पोराला जर सांगितलं भगवान शिव विश्वव्यापी आहेत. ते काहीही करू शकतात तेव्हा त्याने जर म्हटलं की ‘मागे माझं कुत्र गाडी खाली येऊन मेलं तर आपला शिव देव कुठे होते? ते का नाही आलेत वाचवायला?’ किती भारी तर्क आहे. बस हेच तर्क नफिसा हिंदू धर्माबाबत मांडत होती. असे तर्क मी सुद्धा लावत आलोच आहे. हरिद्वारला 10 हजारच्या वर माणसं मेलीत मग तेव्हा कुठे गेला होता देव..? मग आता मला तुम्ही बोलू शकत नाहीत की माझा ब्रेनवॉश झाला आहे.
राहील इस्लाम धर्माचं तर त्यातही नफिसा सांगते की आल्हाह सर्व शक्तिमान आहे. त्याच्याच मुळे जेवायला मिळत वैगरे वैगरे. मग आल्हाह सर्व शक्तिमान आहे तर पाकिस्तानच्या एका शाळेवर हल्ला झाला तेव्हा 50 च्या वर चिमुकले मुलं मेलीत तेव्हा अल्लाह कुठे होता? (अशी बरीच उदाहरणं आहेत..) खरं तर हे देव-धर्म माणसा माणसामध्ये द्वेष आणि विखार पेरतात. प्रत्येक धर्माच्या माणसाला हे वाटत असतं की माझाच धर्म श्रेष्ठ. मुळात माणूस श्रेष्ठ असतो हे तेव्हा आपण विसरून जातो.
त्या तीन मुलींची स्टोरी खरी आहे असं निर्माते सांगतात तर अगदीच त्यांची कहाणी समोर यायला हवीच. आणि त्या कशाला बळी पडल्या हे फक्त हिंदूनेच का बघाव? मुस्लिम लोकांनीही हा चित्रपट बघावा अस अट्टहास का नसावा? मुस्लीम समुदायही जर हा चित्रपट बघेल तर त्यांना ही कळेल ना आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय? आपल्यातला कुणी आप्तस्वकीय आहे का जो isis मध्ये जॉईन झाला आहे? त्याची वागणुक कशी आहे? त्याच जाणं येणं कुठे आहे? तो कुण्या लोकांमध्ये राहतो? पण नाही इथल्या हिंदूनी हा चित्रपट फक्त हिंदू लोकांसाठी बनवला आहे. तो मुस्लिमांनी बघू नये.
एकमेकांनी सोबत राहून हा चित्रपट बघून कोण चुकतंय हे चर्चेने सोडवलं जाऊ शकतं. पण जो धार्मिक रंग या चित्रपटाला दिला आहे तो खूप अस्वस्थ करणारा आहे. या चित्रपटात कोणताच मुस्लिम हा चांगला पोट्रेट केलेला नाही. एकही ही नाही. सारेच मुस्लिम आतंकवादी नसतात काही असतात मौलाना अबुल कलाम आझाद, ए.पी. जे अब्दुल कलाम पण या चित्रपटात सरधोपट मुस्लिम हा अतिशय वाईट रंगवला आहे. कोणते हिंदू आईवडील आपल्या मुलीला मुस्लिम मुलासोबत निशंक नजरेने बोलू देतील? हा चित्रपट मुलींचे स्वतंत्र हिरावून घेतो. चित्रपट बघून बाहेर आल्यावर आता आपण आपल्या मुलीला काय करू द्यायला नको याची अधिकची बेरीज सुरू होते. आतंकवादाला धर्म असतो का? तर हो असतो इथे कुणताच धर्म हा निखळ म्हणून उदयास आला नाही. कुठे ना कुठे धर्मांनी रक्त सांडलेलं आहेच. कोणता एक धर्म चांगला म्हणायला एकही धर्म पात्र ठरत नाही. मग हा इतका वाईट प्रचार का करावा? आणि कशासाठी..? शरियतमध्ये असणारे कायदे स्त्रीच्या जीवावर उठणारे आहेत तसेच मनूच्या कायद्यांनीही स्त्रिच्या अब्रूची धिंड काढली आहे हे विसरता येणार नाही.
कोणता धर्म तिच्या पदराला सावरायला पुढे आला आहे? द केरला स्टोरी सिनेमा निव्वळ धार्मिक द्वेषाच प्रतीक म्हणून इतिहासात नोंदवला जाईल. त्यात दाखवलेल्या स्टोरीमध्ये isis ची बाजू दाखवली आहे. खर तर ती वास्तवात आहेच तशी, त्यांचं अमानवी वागणं हे प्रचंड राग येणारं आणि चीड येणारं आहे. हे मला नादिया मुराद या नोबेल विजेत्या मुलीची माहिती वाचली तेव्हा कळलं.
चित्रपटात बऱ्याच गोष्टी खटकणाऱ्या आहेत. त्यात फक्त हिंदू पीडित दाखवला आहे. आणि शोषण करणारा मुस्लिम. त्या मुली इतक्या लहान नाहीच. की त्यांचा सहज ब्रेनवॉश होईल. 32 हजार मुली मिसिंग आहेत अशी राळ उठवली गेली आणि नंतर ही स्टोरी फक्त 3 मुलींची आहे असा खुलासा करावा लागला. जय भीमसारखे सिनेमे येऊन गेले पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्याबद्दल दोन शब्द सांगावेसे वाटले नाहीत. पण द केरला स्टोरीबद्दल त्यांचा ऊर भरून आला. काही हिंदू भावबंध तर हा सिनेमा हिंदू महिलांनी बघावा म्हणून मोफत शो चे आयोजन करत आहेत. कशासाठी हा राग आणि का? कित्येक वर्षे मुघलांनी भारतावर राज्य केलें मग तेव्हा मुस्लिम लोकसंख्या का वाढली नाही? आता जर मुस्लिम लोकसंख्येची भीती वाटत आहे. तर हा दोलक अजूनही हिंदूंच्या बाजूंनेच का? आणि तरी हिंदू जनआक्रोश करावा लागत आहे.
नरहर कुरुंदकर म्हणतात की सेक्युलॅरिझम हा बहुसंख्याक वर्गासाठी आहे. त्यांनी अल्पसंख्यांक व्यक्तींसोबत कसं वागायला हवं. पण इथे तर द्वेषच दिसतोय. हा चित्रपट प्रबोधन कमी आणि विखार जास्त पसरवत आहे. कुणा आई वडिलांना वाटेल बाहेर गावी पोरीने शिकायला जावं? या चित्रपटाचा धाकचं मनावर इतका बसतो की बाहेर कोणती मुलगी सेफ नाही. असच वाटतं. मग शेवटी तेच तिने बाहेर पडूच नये. आणि हेच तर धर्माला हवं आहे? काय करतील पोरी शिकून? लग्न करून पोरच तर जन्माला घालायची आहेत ना बस मग..आणि हीच तर मनूची शिकवण आहे. आणि त्या चित्रपटात शरियत बद्दल बरसं बोललं गेलं आहे. त्यामध्ये मुलींना खुप बंधन आहेत, त्यांना कमी अधिकार दिलेले आहेत.
आता मुस्लिम वर्गाने ही शरियतची पुन्हा एक नवीन व्याख्या करून आताच्या आपल्या या जगण्याला साजेशी त्याची मांडणी असावी. याबद्दल विचार करावा. मध्ययुगीन काळ संपून गेला आहे. मुस्लिम वर्गानेही शिक्षणाची कास धरणे गरजेचे आहे. कट्टरतेला कट्टरताच उत्तर देत असते अस म्हणत असतांना कट्टरतेला शिक्षण हे चांगलं उत्तर आहे. सिनेमा बघत असतांना जेव्हा केव्हा सिनेमामध्ये ‘अल्हाह हू अकबर’ असा उल्लेख आला तेव्हा सिनेमाघरात ‘जय श्रीराम आणि हिंदूरष्ट्र हो के रहेगा’ अशा घोषणा ऐकू येत होत्या. हे काय दर्शवते तर एकमेकांमध्ये लागलेली चढाओढ. ‘जो नास्तिक आहे तो कम्युनिस्ट आहे’ असाही एक खोटा संदेश या चित्रपटाने दिला आहे.
स्वर्ग, नरक, जन्नत या गोष्टी मरण्यानंतरच्या भपंक कल्पना आहेत. कोण मेल्यानंतर बघू शकतो? या कल्पना जवळ करून काय हाशील? असे बरेच प्रश्न आपल्याला पडत जातात. हा सिनेमा बघताना तुम्ही तटस्थ म्हणून बघायला हवा.
मी कुण्या एक धर्माचा म्हणून बघाल तर तुम्ही माणूस होण्यापासून लांब जाल. पण एक गोष्ट मोठी खेदाने सांगावीशी वाटते द केरला स्टोरीने मनं दुभंगवायचं काम करण्यास कसलीच कस्सर सोडली नाही.
असो, आता या चित्रपटात काम केलेल्या व्यक्तीरेखांबद्दल बोलायचं झालं तर अदा शर्माने पूर्ण ताकदीने चित्रपट उचलून धरला आहे. तिच्यासोबत असणाऱ्या सिद्धी(गीतांजली) इदनानीनेही सुंदर अभिनय केलेला आहे. सोनिया बलानी (असीफा) उत्तम वावरलेली दिसली. बॅग्राऊंड म्युझिकही अंगावर धावून काही तरी बिघडतय याची जाणीव करून देतं. फ्रेम्सही घाबरवून सोडणाऱ्या तर कुठे मनात साठवून ठेवणाऱ्या अशा आहेत. तुम्ही बाहेर येतांना बरेच प्रश्न सोबत घेऊन येतात.
तेव्हा एकच सांगावसं वाटतं की तेव्हा त्या प्रश्नांचा गुंता हा द्वेषाने नाही तर प्रेमाने सोडवला जाऊ शकतो. दिवाळी सोबत ईदही आपण मनवत आलो आहे. तसा हा हिंदू तो मुस्लिम म्हणून एकमेकांपासून अंतर ठेवून राहण्यापेक्षा एकमेकांना साथ देऊन भारताची मान उंच कशी होईल याच नियोजन करायला हवं.. अस मला प्रामाणिकपणे वाटतं.
: लखन शोभा बाळकृष्ण. ११ मे २०२३
You will also like to read: LGBTQ+ यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक स्थान | LGBTQ+ Pride Month