LGBTQ+ Community 2023
LGBTQ+ Community 2023

LGBTQ+ यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक स्थान | LGBTQ+ Pride Month

LGBTQ+ या समुदायाच्या अस्तित्वाची सुरवात ही त्यांच्या घरापासून होते. घरातला संघर्ष मग समाजासोबत सुरू होतो. LGBTQ+ यांची ही बाजू म्हणजेच त्यांची सामाजिक आणि सांस्कृतिक बाजू या लेखात चर्चिणार आहोत.

लखन शोभा बाळकृष्ण

समाज म्हणून बघतांना..

LGBTQ+ community & Culture
LGBTQ+ community & Culture

समाजात वावरत असतांना LGBTQ+ समुदायाकडे लोकं त्यांना उपभोगाचं साधन म्हणून त्यांच्याकडे बघतात. असाच काहीसा अनुभव दिशा पिंकी शेख यांनी सांगितला आहे. दिशा पिंकी शेख ह्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या एका मुलाखतीत बोलल्या होत्या की ‘5 रुपये देतो तुला चलतेस का? समाज आम्हाला पाच रुपये किंमतीत विकत घेऊ पाहतो आहे.’ त्यांच्याकडे सहानुभूतीम्हणूनही बघू नका असं त्या समुदायाचं म्हणणं आहे. सहानुभूती ही अल्पकाळ असते. ती तुम्हाला भावुक करते. त्यातून उत्तरं नाही तर उलट गुंतागुंतच अधिक वाढत जाते. आपल्या बरोबर घेऊन त्यांना माणूसपणाची वागणूक द्या अशी त्यांची रास्त मागणी आहे. अशी बरीच उदाहरणं देता येतील ज्यामध्ये घरी बक्कळ श्रीमंती आहे परंतु आपला मुलगा किंवा मुलगी ही LGBTQ+ या समुदायातील आहे. तिला मुलीबद्दल आकर्षण आहे किंवा तिला मुलासारखं रहावं वाटतय. तेच उलट मुलाबद्दलही. पण या सगळ्यांना जर न्याय मिळवून द्यायचा झाला तर त्याची सुरवात म्हणजे खरा संघर्ष सुरू होतो तो म्हणजे म्हणजे घरापासून.

आपल्या घरचे काय म्हणतील म्हणून आपली लैंगिक ओळख त्यांच्यापासून लपविणे हा एक पर्याय त्या मुला-मुलीकडे उरतो. त्यातून होणारी घुसमट, आपल्याला हवं तसं जगता येत नाही, राहता येत नाही. समाजाचा भाग म्हणून त्यांच्या या कुंठीत जगण्याला आपण जबाबदार ठरत असतो. मी कॉलेजला असतांना आम्हाला श्याम मीना भानुदास हे शिक्षक होते. मराठी शिकवायचे. त्यांच्या वाचनाचा व्यासंग भला मोठा होता. त्यांनी वयाच्या ३० व्या वर्षी आपली लैंगिक ओळख उघड केली. त्यांनी समाजासमोर आपण तृतीयपंथी आहोत आणि मला मुलीसारखं राहायला आवडतं हे सांगितलं. हे आमच्या संकुचित विचारी लोकांना पचणारं नव्हतं. त्यांच्या सहवासातील बऱ्याच लोकांनी त्यांच्यासोबत बोलणं कमी केलं. काहींनी सबंध तोडले.

पण हे सगळं करीत असताना समाज म्हणून आपली काही जबाबदारी होती का?

हे मात्र आम्ही टाळून पुढे जायला लागलो. कुणाचं बारसं आहे म्हणून तृतीयपंथी लोकांना बोलवू, तेव्हा त्यांना शुभ मानणारा हा समाज त्यांना कोणत्याच सामाजिक कार्यक्रमात सामावून घेतांना दिसत नाही. ते नाचे म्हणून लग्न समारंभात नाचवायला आम्हाला आवडतं पण त्यांना समाजकारणात समान पातळीवर खुर्चीवर बसवायला आम्हाला कमीपणाच वाटतं. मुळात ना हा जो शद्ब रूढ केला आहे ‘तृतीयपंथी’ तोच मला आक्षेपार्ह वाटतो. पहिला, दुसरा आणि तिसरा असा भाग कुणी केला? आपण कोण ठरवणारे? माणूस जन्माला येतो तेव्हा तो स्त्री नसतो व पुरुष वा इतरही. त्याला ही सगळी लेबलं आपण लावत असतो. पण सद्या हा तृतीपंथी शद्ब रूढ झालाय. त्यामुळे इथे वापरत आहे.

समज – गैरसमज:-

आजही समाजात तृतियपंथी लोकांबाबत बरेच गैरसमज आहेत. आणि हेच गैरसमज त्यांच्याबद्दल नकारात्मक मत बनवायला मदत करीत असतात. समाजात एक असा भ्रम आहे की तृतीयपंथी लोकांच्या अंत्ययात्रेला जाऊ नये अथवा ती बघू नये. ती बघितल्यास पुढील येणारा जन्म त्यांचाच मिळतो. जे की या गोष्टीत काहीच तथ्य नाही.समाजात त्यांच्याविषयी जर दृष्टीकोन बदलायचा असेल तर ती सुरुवात घरापासून त्यांना सकारात्मक दृष्टीने होईल आणि आज एक घर उद्या दहा घरं होतील. तेव्हा समाज त्यांना स्वीकारेल. पण एक गोष्ट अशी की इथल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये समाजमान्य स्त्री या लिंगाला अजूनही पूर्णपणे आपलंसं केलं नाही. तिला सतत हा समाज पुरुषांच्या तुलनेत दुय्यम स्थान देत आला आहे. त्यात ती जर विधवा असली तरी अजूनच तीच महत्व शून्य. त्यात LGBTQ+ समुदायाला समाजात सामावून घेणं म्हणजे किती सनातनी संकुचित विचारांना तोंड देणं आलं? त्यांच्याकडून चावून घेतलेला रुपया तुम्हाला चालतो पण त्याचं तुमच्या खांद्याला खांदा लावून चालणं कमीपणाचं वाटतं. हा समाजाचा दुटप्पीपणा आहे. हेच अधोरेखित होतं.

LGBTQ+ community & Culture
LGBTQ+ community & Culture

सिनेसृष्टी आणि LGBTQ+

खरं तर ९० च्या दशकात चित्रित झालेले सिनेमे आपण बघितले तर त्यातही LGBTQ + समुदायाची खिल्ली उडवलेली आपल्याला दिसून येते. सिनेमा तर समाजाचा आरसा म्हणून आपण त्याकडे बघतो. पण समाज किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येतं. आजकाल येणाऱ्या सिनेमांमध्ये मात्र एक सकारात्मक बदल दिसून येतोय तो म्हणजे LGBTQ + लोकांकडे आता आपुलकीने बघितलं जातय. त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे हे दाखवलं जाताय आणि ते ऐकलं जातय. शुभ मंगलम ज्यादा सावधान, कपूर अँड संन्स, एक लडकी को देखा तो ऐसा लगा, बधाइ दो, दोस्ताना, फ्रीडम(हा सिनेमा भारतात बॅन आहे, युट्यूबवर मिळून जाईल) अलिगढ ह्यांसारखे सिनमे जे LGBTQ बद्दल भाष्य करतात तेव्हा ही सुखाय बाब आहे. हे बोलायला आपल्याला वाव आहे.

लैंगिक ओळख लपवून ठेवण्याची कारणे:-

आज किती तरी व्यक्ती आपली लैंगिक ओळख लपवून आपापली कामं करीत आहेत. त्यांना वाटतं आपल्याला आपल्या घरचे स्वीकारतील का? घरच्यानंतर हा समाज. जर आपण आपली लैंगिक ओळख सांगितली तर माझ्या घरात लग्नावर आलेल्या माझ्या भावंडांच्या लग्न होतील का? समाज त्यांना कस बघेल? आपल्या आई वडिलांची अब्रू जाईल. अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्यामुळे घरातील ती कींवा तो आपली लैंगिक ओळख उघड करत नाहीत. कित्येक वेळा तर ती किंवा तो त्यांना इच्छा नसली तर लग्नही करून घेत असतात. परंतु लग्नानंतर त्याची सत्यता बाहेर आली की मात्र त्या दोघांचे ही आयुष्य देशोधडीला लागते. मानसिक कुचंबणा सहन करावी लागते. त्यात कुणी आत्महत्या करतं तर कुणी या समाजपासून स्वतःला कोंडून घेतं. ही समाजातील वास्तविकता आहे. यावर उत्तर शोधलं पाहिजे.

LGBTQ+ साठी काम करणाऱ्या संस्था –

समाजात अशा अनेक संस्था आहेत की ज्या LGBTQ साठी सोशल वर्क करतांना दिसतात. त्यामध्ये THE HUMSAFAR TRUST, नाझ, मासुम, अनिस ह्या संस्था आहेत. वेगवेगळ्या राज्यात अशा अनेक संस्था आहे ज्या LGBTQ+ या समुदायासाठी काम करतांना आपल्याला दिसून येतात. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एका NGO ने LGBTQ+ समुदायासाठी शाळा सुरू केली आहे. ही एक स्तुत्य बाब आहे. अनिस असेल वा इतर तत्सम संस्था मोठ्या प्रमाणावर या समुदायासाठी काम करीत आहेत.

LGBTQ+ community & Culture
LGBTQ+ community & Culture

केरळमध्ये पाहिला ट्रान्सजेंडर वकील:-

केरळला पहिला ट्रान्सजेंडर वकील मिळाला आहे. पद्मलक्ष्मी केरळमधील पहिल्या ट्रान्सजेंडर वकील ठरल्या आहेत. पद्मा यांना लहानपणापासून वकील व्हायचे होते. भौतिकशास्त्रात पदवी घेतल्यानंतर एलएलबीला प्रवेश घेतला. एलएलबीच्या शेवटच्या वर्षाला असताना त्याने आई-वडिलांशी आपली ओळख सांगितली. त्यांनी निवडलेल्या वाटेवर चालण्यासाठी कुटुंबाने पूर्ण पाठिंबा दिला. ही बाब किती आनंदाची आहे तुमचं कुटुंब तुम्हाला समजून घेऊन तुमच्यासोबत उभं राहतं. आणि आज समजात आपल्याला हेच आवश्यक आहे. आपल्याला या समुदायासोबत उभं राहायचं आहे.

वास्तविकता –

तृतीयपंथी म्हटलं की आजही अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. कायद्याने या समाजाला किती हक्क किंवा अधिकार दिले तरीदेखील समाजातील लोक त्यांच्याकडे अस्पृश्यतेसारखे बघत असतात. त्यामुळे आजही हा वर्ग अन्याय सहन करताना दिसतो. परंतु, मनात जिद्द असेल तर कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करता येते हे याच समाजातील एका व्यक्तीने दाखवून दिलं आहे. अथक परिश्रम आणि जिद्द यांच्या जोरावर झोया खान हिची कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) विभागात निवड झाली आहे. सीएससीमध्ये दाखल होणारी ती देशातील पहिली ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच सीएससी विभागात जोयाची निवड झाली असून या विभागात काम करणारी ती पहिली ट्रान्सजेंडर ठरली आहे.

२०१८ पर्यंत समलैंगिक संबंध भारतामध्ये बेकायदेशीर होते. समलैंगिक संबंधांसंदर्भातील भारतातील कायदा हा इंग्रजांनी तयार केला होता. इंग्रजांनी कलम ३७७ अंतर्गत ज्या देशांमध्ये त्यांची सत्ता होती त्या देशांमध्ये हा कायदा लागू केला होता. भारतीय दंडविधानातील कलम ३७७ नुसार, “कोणत्याही महिला, पुरुष अथवा प्राण्याशी अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवणे” (यात समलैंगिक संबंधांचाही समावेश व्हायचा) बेकयादेशीर आणि शिक्षेस पात्र होतं. परंतु आता सन २०१८ मध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाने यापैकी समलैंगिक संबंध ठेवण्यासंदर्भातील भाग कायदेशीर कारवाईच्या अंतर्गत येणार नाही असं सांगितलं. समलैंगिक संबंध है कायद्याने गुन्हा ठरणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं. त्यामुळे LGBTQ समुदायाला मोठा दिलासा मिळाला आहे.

पण तरी एक गोष्ट मात्र इथे राहतेच.भारतामध्ये समलैंगिक विवाहांना अजून मान्यता दिलेली नाही. ही बाब त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर अन्यायकारक ठरणारी आहे. त्यांनी लग्न करावे अथवा करू नये हे ठरवणारे आपण कोण..? पण धर्माच्या ठेकेदारांनी मात्र ते ठरविण्याचा मालकी हक्क आपल्या स्वतःकडे राखीव ठेवला आहे. समलैंगिक लोकांना भावना नसतात का? याचा कुणी विचार केलेला दिसत नाही. समलैंगिक विवाहाबाबत भारतातील कट्टरवादी धार्मिक संघटनांनी रोजदार विरोध केलेला आहे. त्यांच्या मते ही आमच्या संस्कृतीची मोडतोड आहे. हे अनैसर्गिक आहे. मुळात त्यांच्या विरोधाला कसलाच आधार नाही आणि त्यात तथ्यही नाही. तर अशा प्रकारे LGBTQ+ या समुदायाची सद्य स्थिती, त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी केलेलं कायदे आणि त्यांचे हक्क संकुचित करू पाहणारे कायदे याबद्दल आपण विस्तृत चर्चा केलेली आहे. त्यांना जास्त अपेक्षा नाहीत, बस हवी आहे माणसाला माणूस म्हणून मिळणारी वागणूक. आणि आपण समाजाचे एक अंग म्हणून ती त्यांना देणं आपलं कर्तव्य आहे.

लखन शोभा बाळकृष्ण. दि. ३० एप्रिल २०२३

LGBTQ+ community & Culture
LGBTQ+ community & Culture
0 Shares

This Post Has 2 Comments

Leave a Reply